Vasant Deshmukh On Jayashree Thorat: विखेंच्या सभेत वसंत देशमुखांचे जयश्री थोरातांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; संगमनेर पेटले, पोलिसठाण्यात ठिय्या …

Vasant Deshmukh On Jayashree Thorat: विखेंच्या सभेत वसंत देशमुखांचे जयश्री थोरातांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; संगमनेर पेटले, पोलिसठाण्यात ठिय्या …
अहमदनगर (प्रतिनिधी) – संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे भाजपचे माजी खा. सुजय विखे (sujay vikhe) यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान भाजपचे वसंत देशमुख यांनी माजी मंत्री आणि काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांची कन्या जयश्री थोरात (Jayashree Thorat) यांच्याबद्दल एक आक्षेपार्ह विधान केल्यामुळे धांदरफळसह संगमनेर तालुक्यात याचे पडसाद पाहायला मिळाले आहेत. यावेळी थोरात यांच्या कार्यकर्त्यांनी सभा संपल्यानंतर बॅनर आणि काड्यांची जाळपोळ केली. तसेच संबंधितांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत याबाबत चौकशी सुरु होती. कार्यकर्त्यांनी मात्र गुडहाडाखाल करून अटक करेपर्यंत ठिय्या देण्यावर ठाम होते.
धांदरफळ येथे भाजपचे वसंत देशमुख यांनी जयश्री थोरात यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले. आपल्या कन्येला समजवा…नाहीतर आम्ही निवडणुकीच्या काळात मैदानात उतरलो, तर तुमची मुलगी घराबाहेर पडणार नाही. सुजय विखे पाटील, त्यांना ताई म्हणातात. पण सुजयदादा या ताईचे पराक्रम सगळ्या तालुक्याला माहिती आहे, असे वक्तव्य वसंत देशमुख यांनी केले. वसंत देशमुखांच्या या विधानानंतर संगमनेरमध्ये राडा झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच राज्यातील राजकीय विरोधकांनी यांचा जाहीर निषेध व्यक्त केला आहे.
दरम्यान काल रात्रीच्या जाळपोळच्या घटनेनंतर आता तालुक्यातील परिस्थित नियंत्रणात आहे. धांदरफळ गावामध्ये काल रात्री मोठा गोंधळ झाल्यानंतर सभा स्थळावरील सुजय विखे पाटलांच्या युवा संकल्प मेळाव्याचे बॅनर थोरात समर्थकांकडून काढण्यात आले होते. तसेच आज या वक्तव्याचा निषेध करत धांदरफळ गाव बंद ठेवण्यात आले आहे.
आमदार बाळासाहेबी थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात, माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, नगराध्यक्ष दुर्गा तांबे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाले. आक्षेपार्ह विधान करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या आंदोलन सुरू केले. आज सकाळी देखील या घटनेचा निषेध करण्यात येत आहे. पोलिसांवर दबाव असल्याची चर्चा देखील येथे सुरु आहे. त्यामुळेच गुन्हा दाखल करून घेण्यासाठी उशीर पोलीस यंत्रणेकडून केला जात असल्याचे म्हटले जात आहे.
घटनेचा निषेधच : डॉ. सुजय विखे
दरम्यान घटनेच्या काही वेळानंतर माजी खा. सुजय विखे यांनी संबंधित घटनेचा आपण निषेध करत असल्याचे म्हटले. तसेच ते म्हणाले कि, मकहायुतीतील कोणताही नेत्याने हे बोलले असते तरी ते निषेधार्ह आहे. अशाना पक्षातून काढून टाकण्यात येईल. आम्हाला देखील कुटुंब आहे. महिलांवरील हे वक्त्याच्या चुकीचेच आहे. त्याचा मी निषेध करतो. संबंधितांवर कारवाई करावी. मात्र कार्यकर्त्यांच्च्या काडी जाळण्यात आली. तोडफोड करण्यात आली याचाही विचार करावा आणि कारवाई करावी. थोरातांच्याकडून हा पूर्वनियोजित कट होता असेच या घटनेवरून दिसतेय. आपल्यावरील हल्ला कार्यकर्त्यांनी आपल्या अंगावर घेतला. निवडणूक आयोगाकडे याबाबत माहिती देऊन आशा वातावरणात निवडणूक होईल कि नाही अशी शंका आहे. त्यामुळे आयोगाकडे तक्रार करणार आहे. यापुढेही युवा संकल्प यात्रा सुरु राहील. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा कोणताही पोलीस यंत्रणेवर दबाव नाही. राजकारण वेगळ्यावळणावर घेऊन जात असल्याचा आरोप डॉ. विखे यांनी आमदार थोरात यांच्यावर केला आहे.
पोलिसांवर दबाव, महिलांचा अपमान : जयश्री थोरात
माजी खा. सुजय विखे पाटील यांनी पातळी सोडून माझ्यावर टीका केली आहे. देशमुख हे माझ्या वडिलांचे वयाचे. त्यांना हे बोलणे शोभते का ? आमचे जरी विरोधक आहेत मात्र अशी पातळी सोडणे योग्य नाही. आमदार बाळासाहेब थोरात हे राज्याचे नेते आहेत. सुमारे ८ तास पोलिसठाण्यात ठिय्या दिला. मात्र त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे. देशमुख फरार आहेत. मुलींनी – महिलांनी राजकारणात यावं कि नाही. मी लढत राहील. आम्ही पातळी सोडून काम करत नाही. मग त्यांनी असे का करावे. लाडकी योजना राबवता मात्र सरकारला महिलांचा मान – सन्मान जप्त येत नाही हि खेदाची गोष्ट आहे, असे युवक काँग्रेसच्या अध्यक्ष जयश्री थोरात यांनी म्हटले आहे.
भाजपने निवडणुकीसाठी खालचा स्तर गाठला : वडेट्टीवार
सावित्रीमाई फुले यांची जन्मभूमी – कर्मभूमी असलेल्या महाराष्ट्राच्या इतिहासात भर राजकीय सभेतून स्त्रियांचे असे चारित्र्यहनन कधी केले गेले नव्हते. परंतु निवडणुकीत मतांसाठी कोणत्या ही स्तराला जाणाऱ्या भाजपने या निवडणुकीत तो खालचा स्तर गाठून महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला आणखी एक गालबोट लावला आहे, असे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.