विकी कौशलच्या “छावा” चित्रपटाचा लूक व्हायरल

विकी कौशलच्या "छावा" चित्रपटाचा लूक व्हायरल
अभिनेता विकी कौशल आपल्या अभिनयामुळे चांगलाच प्रसिद्ध आहे. अनेक मोठमोठ्या चित्रपटांचे प्रोजेक्ट्स तो सध्या करत आहे. त्यापैकीच बहुचर्चित प्रोजेक्ट म्हणजे.‘छावा’. या चित्रपटात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. एके ठिकाणी जंगलातील प्रशिक्षण काळातील चित्रीकरणाचे शूटिंग सुरु असतानाच हा लूक असावा असे म्हटले जातेय.

या भूमिकेसाठी त्याने तलवारबाजी आणि घोडेस्वारीचंही प्रशिक्षण घेतलं आहे. सध्या या चित्रपटाचं शूटिंग सुरू असून त्यातील विकीचा सेटवरील लूक सोशल मीडियावर वायरल झाला आहे. त्याचा हा अप्रतिम लूक पाहिल्यानंतर चित्रपटाविषयी प्रेक्षकांमधील उत्सुकता आणखी वाढली आहे.
मोठे केस, दाढी, कपाळावर टिळा, गळ्यात माळ, अशा त्याच्या या दमदार लूकने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर करत आहेत. त्यांच्यासोबत विकीचा हा दुसरा चित्रपट असेल. याआधी दोघांनी ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं.
“छावा” हा चित्रपट यावर्षी 6 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं कळतंय. या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटात अभिनेत्री रश्मिका मंदाना ही येसुबाई भोसलेंच्या भूमिकेत दिसणार आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यापासून या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. या चित्रपटाची कथा डॉ. जयसिंगराव पवार यांच्या पुस्तकावर आधारित आहे.