कुस्ती मैदानात झाडाची फांदी कोसळली; जीवितहानी नाही

कुस्ती मैदानात झाडाची फांदी कोसळली; जीवितहानी नाही
पैलवानांसह प्रेक्षकांची पळापळ
करंजी (प्रतिनिधी) – पाथर्डी तालुक्यातील चिचोंडी येथील दोन तोंड्या मारुती यात्रा उत्सव शेवट निकाली कुस्त्यांच्या हागाम्याने झाली. या कुस्ती हंगाम्यात कुस्ती सुरु असताना अचानक झाडाची फांदी पडल्याने पैलवानांसह प्रेक्षकांची पळापळ झाली. मात्र यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही, १ जण किरकोळ जखमी झाले.

यात्रा कमिटीचे प्रमुख एकनाथराव आटकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कुस्त्या निकाली निघाल्या. यावेळी पाथर्डी, नेवासा, शेवगाव, आष्टी आदी ठिकाणाहून पैलवान कुस्त्या खेळण्यासाठी आले होते. पाचशे रुपयांपासून 21 हजारापर्यंत या ठिकाणी कुस्त्या लावण्यात आल्या होत्या. यात्रा कमिटीने दिलेल्या भरपूर इनामामुळे कुस्तीपटुनी देखील समाधान व्यक्त केले. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ऐन हगामा रंगात आलेला असतांनाच ज्या झाडाखाली कुस्त्यांचा हंगामा भरवलेला होता त्याच झाडाची एक भली मोठी फांदी अचानक कुस्ती मैदानाच्या कठड्यावर पाडल्याने या ठिकाणी मोठा गोंधळ उडाला. मात्र या ठिकाणी कोणतीही दुर्दैवी घटना घडली नाही.
यात्रा कमिटीचे प्रमुख एकनाथ आटकर, सरपंच श्रीकांत आटकर, विठ्ठल गायकवाड, संदीप दानवे, आबासाहेब गरुड यांच्यासह यात्रा कमिटीच्या सर्व सदस्यांनी तात्काळ धावून येत या फांदीमुळे कोणी जखमी झाले आहे का याची विचारपूस करत मदतीला धावून आले. यावेळी एका व्यक्तीला ही फांदी घासून गेल्याने किरकोळ इजा झाल्याचे समजले. त्यानंतर कुस्त्या सुरळीत पार पडल्या.